Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या तुफानी व्हायरल होत आहे. हिमालयात आढळणारी जडी बुटी आहे आणि ती पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात तरंगते असे सांगून एक पोस्ट व्हायरल केली जात आहेत. ही वनस्पती एक जडी बुटी असून ती अद्भुत आहे असा दावा करण्यात येत आहे.
“ही हिमालयात आढळणारी गरुड संजीवनी जडी बुटी आहे.हिचं काष्ट पाण्यात विरुद्ध दिशेनं पुढं सरकतं . आकार सर्पिल असल्यानं पाण्याचा प्रवाह हिला अडवू शकत नाही आणि पाण्याच्या प्रवाहात जागच्या जागी वळसा घेते पाणी कापीत पुढं जाते.अदभुत नजारा.” असा मजकूर लिहून ही पोस्ट करण्यात येत आहे. अनेकांनी मोठ्याप्रमाणात ही पोस्ट शेयर केली आहे.
आम्ही या दाव्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ही जडी बुटी अर्थात औषधी वनस्पती असून ती पाण्याच्या प्रवाहात विरुद्ध दिशेने फिरते असा बहुतेक सर्व युजर्सनी दावा केला असल्याने आम्ही अशा प्रकारे कोणती औषधी वनस्पती आहे का? याचा शोध गुगल वर घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला अशी कोणतीही माहिती मिळाली नाही.
आम्हाला हा शोध घेत असताना औषधी वनस्पतींबद्दल माहिती देणाऱ्या काही संकेतस्थळांचा शोध लागला. मात्र अशी वैशिष्टये आढळणारी कोणतीही वनस्पती सापडली नाही. आरोग्यविद्या या संकेतस्थळावर आम्हाला इतर अनेक औषधी वनस्पतींबद्दल माहिती मिळाली मात्र आम्हाला अशी वैशिठ्ये सापडली नाहीत. दावा करणाऱ्यांनी नेमकी ही जडी बुटी कोणत्या आजारावर उपचार करण्यास उपयुक्त आहे, याचा उल्लेख न केल्यामुळे आम्हाला नेमका शोध लागू शकला नाही. गरुड संजीवनी बुटीच्या नावे अनेक गैरसमज पसरविले जात आहेत याची माहितीही आम्हाला मिळाली.
हा शोध करीत असताना लोकमत ने प्रसिद्ध केलेली १ डिसेंबर २०२२ ची एक बातमी आमच्या सामोरी आली. पाण्याच्या प्रवाहाविरोधात पोहणारी एक मुळी आपण पाहिलीत का? तुम्हालाही हा एक चमत्कारच वाटेल, पण हा चमत्कार नसून भौतिक शास्त्राच्या नियमाप्रमाणे ही मुळी तरंगते असे त्यांनी या बातमीत म्हटले आहे. ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ मधुकर बाचूळकर यांनी सोशल मीडियावर होत असलेला दावा खोडून काढला असून हा प्रकार चमत्कार वगैरे काहीच नसल्याचे या बाबतीत म्हटले आहे. असे त्या बातमीत लिहिलेले आढळले.
आम्ही या बातमीचा संदर्भ घेऊन डॉ. मधुकर बाचूळकर यांना नेमके काय म्हणायचे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. “व्हायरल पोस्ट मधील व्हिडिओमध्ये दाखविली जात असलेली मुळी ही प्रामुख्याने मूळ नसून प्रवाहाच्या विरोधात वाहते ही अद्भुत किमया आहे, असे जे म्हटले आहे ते पूर्णतः चुकीचे आहे. भौतिक शास्त्रातील नियमांनुसारच ही पाण्यात तरंगण्याची क्रिया झालेली आहे. याच आकाराची व वजनाची अल्युमिनियम किंवा प्लॅस्टिकची वस्तू तयार करून वाहत्या पाण्यात सोडली तरी ती वस्तूही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनेच जाते. यामुळे ही फक्त ठराविक वनस्पतींचीच किमया नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितलेले आहे.
याच गोष्टीला पुष्टी मिळविण्यासाठी आम्ही पर्यावरणवादी आणि प्रदूषण या विषयावर विशेष काम करणारे उदय गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. “डॉ. मधुकर बाचूळकर यांनी मांडलेला मुद्दा अतिशय खरा आहे. व्हायरल दावा खोटा आहे. भौतिक शास्त्राप्रमाणे घडणाऱ्या गोष्टींना चुकीच्या पद्धतीने व्हायरल केले जात आहे,” असे त्यांनी न्यूजचेकर शी बोलताना सांगितले. या संदर्भात व्हायरल दावा खोडून काढणारे एक ट्विट ही आम्हाला सापडले. ज्यामध्ये आपल्याला व्हायरल व्हिडिओही पाहता येईल.
अशाप्रकारे आमच्या तपासात व्हायरल दावा पूर्णपणे खोटा असल्याचे निदर्शनास आले आहे. कोणतीही वस्तू ठराविक आकारात बनविली गेल्यास ती पाण्यात विरोधी दिशेने तरंगू शकते हे सिद्ध झाले असून, हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Information published by Aarogywidhya Website
News published by Lokmat on December 1,2022
Quote of Botonist Dr. Madhukar Bachulkar
Quote of Environmentalist Uday Gayakwad
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in