schema:text
| - स्टॅन्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा एक व्हिडिओ शेअर करत दावा केला जात आहे की, मुनव्वर फारुकीने कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईची माफी मागितली आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ लॉरेन्स बिष्णोईशी संबंधित नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये मुनव्वर फारुकी माफी मागताना दिसतो. व्हिडिओच्या ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “लॉरेंस बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे कॉमेडियनने आपला सूर बदलला का? मुन्नावर फारुकीचा माफीनामा.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम व्हायरल व्हिडिओ पाहिल्यावर कळते की, मुनव्वर फारुकी त्याच्या एका कार्यक्रमात कोकणी लोकांवर केलेल्या विनोदाबद्दल माफी मागताना दिसतो. या ठिकाणी कुठे ही मुनव्वर लॉरेंस बिश्नोईबद्दल बोलताना दिसत नाही.
किव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, मुनव्वर फारुकीने ऑगस्ट महिन्यात मुंबईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान क्राऊड वर्क म्हणजेच लोकांशी संवाद साधतांना कोकणी लोकांवर वदग्रस्त विनोद केले होते. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेक लोकांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच भाजप नेते नितेश राणे आणि मनसे कार्यकर्त्यांनी मुनव्वरवर कारवाईची मागणी केली होती. अधिक माहिती येथे व येथे वाचू शकता.
लोकांची नाराजी पाहून मुनव्वर फारुकीने 12 ऑगस्ट रोजी आल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर माफीचा व्हिडिओ शेअर केला.
यामध्ये तो म्हणतो की, “मी एका कार्यक्रमात क्राऊड वर्क साधत होतो. त्यात कोकणाचा विषय निघाला. तळोजामध्ये कोकणी लोक राहतात मला ठाऊक आहे. कारण माझे अनेक मित्र तिथे राहतात. मात्र मी जे बोललो ते जरा संदर्भ सोडून झाले. मी कोकणाची खिल्ली उडवली असं अनेकांना वाटले. मात्र माझा तो हेतू मुळीच नव्हता. मी आत्ताही तेच सांगू इच्छितो की क्राऊड वर्कमध्ये मी ते बोलून गेलो. मात्र मी पाहिले की, लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मी एक कॉमेडियन असून माझे काम लोकांना हसवणे आहे, दुखवणे नाही. त्यामुळे मी मनापासून जे दुखावले गेलेत त्यांची माफी मागतो. माझ्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या मी त्यांची माफी मागतो. इंटरनेटवर तो जोक व्हायरल झाला आहे. मात्र मी तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागतो.”
मुनव्वर फारुकी लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टवर का ?
अनेक बातमी पत्रानुसार नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) संकलित केलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या हिट-लिस्टमध्ये बॉलीवूड अभिनेते, विनोदी कलाकार, राजकारणी आणि बरेच काही समाविष्ट आहेत. ज्यामध्ये मुनव्वर फारुकीचे देखील नाव समाविष्ट आहे. अधिक माहिती येथे वाचू शकता.
लोकसत्ताच्या बातमीनुसार लॉरेन्स बिश्नोई गँगच्या काही सदस्यांनी गेल्या महिन्यात मुनव्वरला दिल्लीत ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले, ही हिट लिस्ट जारी झाल्यानंतर मुनव्वर फारुकीला सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
फारुकीला लक्ष्य करण्यामागची नेमकी कारणे अद्याप समोर आलेली नाहीत. एका अधिकाऱ्याने सांगितले, “हिंदू देवतांवरच्या त्याच्या टीकेमुळे या गँगचे सदस्य संतापले होते.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ दोन महिन्यापूर्वीचा असून लॉरेन्स बिष्णोईशी संबंधित नाही. मुळात मुनव्वर फारुकी या व्हिडिओमध्ये कोकणी माणसांवर आक्षेपार्ह विनोद केल्याबद्दल माफी मागताना दिसतो. खोट्या दाव्यसह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
Title:मुनव्वर फारुकीने माफी मागितल्याचा व्हिडिओ लॉरेन्स बिष्णोईशी संबंधित नाही; वाचा सत्यWritten By: Sagar Rawate
Result: Misleading
|