schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
महावितरण या महाराष्ट्राला वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी तसेच वीजउत्पादन आणि पुरवठ्याशी संबंधित इतर कंपन्यांचे कर्मचारी मंगळवार दि. ३ जानेवारी रात्री बारा ते शुक्रवार दि. ६ रोजी रात्री १२ पर्यंत सलग ७२ तास संपावर जात आहेत. या काळात वीजपुरवठा खंडित राहू शकतो त्यामुळे आपण आपले मोबाईल रिचार्ज करून ठेवा. घरात लागणारे पीठ दळून ठेवा अशा आशयाचा एक संदेश सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून हा संदेश महाराष्ट्रात पसरला असून अनेक युजर्स स्वतः वाचून तो संदेश पुढे पाठवू लागले आहेत.
फेसबुकवरही समान मथळ्याखाली असंख्य दावे मिळाले आहेत. “महाराष्ट्र सरकार महावितरण चे खासगीकरण करू पाहत आहे. याविरोधात आमचा हा संप असून यासाठी होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. या ७२ तासाच्या काळात अडचणी टाळण्यासाठी पाणी भरून ठेवा, मोबाईल चार्ज करून ठेवा, दळप दळून ठेवा.” असे या दाव्यात म्हटले आहे. “आम्ही हा संप न्याय मागण्यासांठी करीत आहोत.” “सर्व विद्युत ग्राहकांना विनंती त्यांनी आपले मोबाईल चार्ज करून ठेवावेत. पाण्याच्या टाक्या भरून घ्याव्यात. दळण दळून घ्यावेत. कारण 4,5,6 जानेवारी 2023 ला संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी संपावर राहतील. हा संप तुम्हाला त्रास होईल अशा उद्देशाने बिलकुल नाही. आम्हाला काही मिळवायचे आहे, असा सुद्धा या संपा मागे उद्देश नाही. पण फ्री सिम देऊन हळूहळू बीएसएनएल कंपनी जशी गिळंकृत केली तशी सार्वजनिक उद्योग महावितरण गिळंकृत करायला कोणी येत असेल तर त्याला हा विरोध होय. नक्कीच हे तीन दिवस त्रासदायक होतील. पण आम्ही दिलगीर आहोत. हा संप फक्त ग्राहकांकरिता आहे.उदा BSNL बुडण्यापूर्वी GIO फुकटात आजीवन सिम ,जास्त स्पीड चा भरपूर डेटा पॅक देत होतं आज कमी स्पीड चा डेटा पॅक ला 700 रुपये मोजावे लागतात. उद्या मोबाईलच्या रिचार्ज प्रमाणे विजेचे दर सामान्य ग्राहकाला परवडणारे राहणार नाहीत. त्यासाठी काही भांडवलदार आसुसलेले आहेत. त्यांचे विरोधातील हा संप आहे. काही ग्राहक सेवेमुळे दुखावलेले असतील, वसुल्यामुळे नाराज असतील पण सार्वजनिक उद्योग टिकला पाहिजे तो कोणताही का असेना. वीज ही रोजच्या वापरातील सर्वांना हवी असणारी वस्तू आहे ती उद्या खाजगी भांडवलदाराच्या हातात गेल्यास भविष्यातील दरवाढ ग्राहकाला मुळीच परवडणारी नसणार करिता हा संप आहे. पुन्हा एकदा क्षमस्व 🙏🙏” असे हा संदेश सांगतो.
व्हायरल मेसेज बद्दल सोशल मीडियावर चर्चा होऊ लागताच भीतीचे वातावरणही तयार होऊ लागले होते. शेतकरी, उद्योगधंदे, कामगार, नोकर, विद्यार्थी आदी घटक विजेवर अवलंबून असतात. दरम्यान सलग ७२ तास महाराष्ट्र राज्य अंधारात राहील कि काय? अशा धास्तीचा सूर उमटू लागला होता. यामुळे व्हायरल मेसेज चा शोध आम्ही घेतला. समाजाला पूर्वसूचना देण्याच्या उद्देशाने पसरविला जाणारा हा मेसेज कोणीही एकाद्या सोशल मीडिया खात्यावर स्वतःच्या किंवा संघटनेच्या नावावर अधिकृतपणे पोस्ट केला असल्याचे आम्हाला दिसून आले नाही. शिवाय महावितरण च्या अधिकृत संकेत स्थळावर आम्हाला याबद्दल कोणतीच सूचना देण्यात आल्याचे पाहावयास मिळाले नाही.
संप आणि संप करणाऱ्या महावितरण कर्मचारी संघटनांची भूमिका याबद्दल आम्ही शोध घेतला असता, लोकमत ने प्रसिद्ध केलेली बातमी आम्हाला मिळाली. खासगीकरणाच्या विरोधात हा संप होत आहे. असे यामध्ये म्हटले आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित की अखंडित याबद्दल ठोस माहिती मिळाली नाही.
यामुळे आम्ही महावितरण च्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांच्याशी संपर्क साधला. “संप होणार असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे.” अशी माहिती त्यांनी दिली. जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहेत का? असे विचारले असता आम्ही ग्राहकांना संदेश पाठवून ” आम्ही वीजपुरवठा खंडित होणार नाही यासाठी प्रयत्नशील आहोत” असे संदेश पाठवीत आहोत. असे त्यांनी सांगितले.
राज्यस्थरावरील माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही महावितरण चे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे यांच्याशी संपर्क काढला असता, नागरिकांच्या मनामधील संभ्रम दूर करण्यासाठी जारी केलेली प्रेस नोट त्यांनी न्यूजचेकरला उपलब्ध करून दिली.
“महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अभियंता, तंत्रज्ञ, कर्मचारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवार दि. ४ जानेवारीच्या शून्य तासांपासून ६ जानेवारीपर्यत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण संपूर्ण काळजी घेत असून याउपरही वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्र. 1800-212-3435/1800-233-3435/1912/19120 यावर संपर्क साधावा.” असे आवाहन त्यांनी केले आहे. महावितरण ने प्रेस नोट जारी करताच त्याबद्दलचे मीडिया रिपोर्ट ही उपलब्ध झाले आहेत.
महाराष्ट्रात वीज उत्पादन आणि पुरवठ्याशी निगडित कर्मचारी सलग ७२ तास संपावर जात आहेत. सरकार आणि कर्मचारी यांच्यातील वाटाघाटींवर संप कितीकाळ होईल हे निश्चित असणार आहे. दरम्यान याकाळात संपूर्ण महाराष्ट्रातील वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची पूर्ण काळजी महावितरण ने घेतली आहे. असे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान संपकर्त्यांची भूमिका आणि त्याबद्दलची भावना याबद्दल आम्ही कोणतेही भाष्य केलेले नाही.
Our Sources
Pressnote released by Mahavitaran
Conversation with chief and divisional PRO of Mahavitaran
(Update: हा संप ७२ तास होणार होता. मात्र सरकारने खासगीकरण करणार नाही असे आश्वासन दिल्याने बुधवार दि. ४ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी, अभियंता संघर्ष समितीने हा संप मागे घेतला आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Prasad Prabhu
June 20, 2023
Prasad Prabhu
January 7, 2023
Prasad Prabhu
November 22, 2022
|