schema:text
| - बांगलादेशातील सेक्स वर्कर्सना मारहाण केल्याचा व्हिडिओ हिंदू महिलांना बुर्खा सक्ती म्हणून व्हायरल
एक व्यक्ती महिलांचा पाठलाग करुन त्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दावा केला जात आहे की, बांगलादेशात बुरखा न घातल्याने हिंदू मुलींना मारहाण केली जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये व्यक्तीला बांगलादेशातील सेक्स वर्कर्सना मारहाण केल्याने पोलिसांनी त्याला आटक केले. व्हायरल होणारा दावा खोटा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये निळ्यारंगाचे टी-शर्ट घातलेला एक व्यक्ती महिलांचा पाठलाग करुन दांड्याने मरहाण करताना दिसतो.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहितात की, “बांगलादेशात बुरखा न घातल्याने हिंदू मुलींचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली जात आहे.”
व्हायरल पोस्टमध्ये हिंदी, बंगाली, गुजरात, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि नेपाळी भाषेत हाच दावा केले आहे.
मूळ पोस्ट — फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये ही घटना घडली होती.
बांगलादेशातील दैनिक प्रथम आलोने 1 सप्टेंबर रोजी आपल्या वेबसाईटवर व्हायरल व्हिडिओचा स्क्रीनशॉट शेअर करत बातमी दिली की, “बांगलादेशची राजधानी ढाक्यातीलमधील श्यामोली परिसरात ‘एचएम रसेल सुलतान’ नावाच्या व्यक्तीने महिला सेक्स वर्करना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता.”
बांगलादेशच्या समाज कल्याण मंत्रालयाचे सल्लागार शार्मिन एस. मुर्शिद यांनी व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “अशा घटना मानवाधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या असून कोणीही कायदा घेऊ शकत नाही. वस्तुस्थिती पाहिल्यावर मी संबंधित पोलिस स्टेशनशी संपर्क साधला आणि या घटनेशी संबंधित आरोपीना शिक्षा करण्याची मागणी केली.”
तसेच बांगलादेश महिला परिषदेच्या अध्यक्षा डॉ.फौजिया मुस्लिम यांनी या घटनेचा निषेध करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली.
मूळ पोस्ट – ढाका ट्रिब्यून | आर्काइव्ह
पुढे एचएम रसेल सुलतानचे फेसबुक खाते तपासल्यावर व्हायरल व्हिडिओ आढळला नाही. परंतु, सुलताने 29 ऑगस्ट रोजी आपल्या फेसबुक अकाउंटवरून लाईव्ह व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये रसेल सुलताने व्हायरल व्हिडिओमधील निळ्यारंगाचे तेच टी-शर्ट घालेले आहे.
या व्हिडिओमध्ये रसेल सुलतान आपण एका सेक्स वर्कर्सना मारहाण केल्याची कबूली देतो. तसेच बांगलादेशात वेश्या व्यवसाय चालणार नसल्याचे सांगतो.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील व्यक्तीने बांगलादेशातील हिंदू मुलींना नाही तर सेक्स वर्कर्सना मारहाण केली होती. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
|