schema:text
| - सियाराम बाबाचा व्हिडिओ गुहेत सापडलेली 188 वर्षांची व्यक्ती म्हणून व्हायरल
एका अत्यंत वयोवृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, एका गुहेत ही व्यक्ती सापडली असून तिचे वय १८८ वर्षे आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा भ्रामक आहे. ही व्यक्ती सियाराम बाबा असून ते 109 -110 वर्षांचे आहेत. ते गुहेत सापडलेले अज्ञात व्यक्ती नाहीत.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक सडपातळ शरीरयष्टी, लांब केस व दाढी आणि लंगोट घातलेल्या वृद्ध व्यक्तीला दोन तरुण आधार देत घेऊन जाताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की,“गुहेत सापडलेल्या ह्या व्यक्तीचे वय ऐकून अधिकाऱ्यांचा कानावर विश्वास बसला नाही. 188 वर्षांच्या या व्यक्तीला आरोग्य अधिकाऱ्यांनी लांब केस आणि दाढी असलेल्या त्वचा आणि हाडांच्या अवस्थेत गुहेतून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम व्हायरल व्हिडिओ संदर्भात कीव्हर्ड सर्च केल्यावर व्हायरल क्लिपशी मिळताजूळता व्हिडिओ सापडला.
संत श्री सियाराम बाबा या युट्यूब चॅनलने 2 ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ शेअर केला होता. व्हायरल होत असलेल्या क्लिपमधील तरुणदेखील या व्हिडिओत दिसतात.
व्हिडिओनुसार, वृद्ध व्यक्तीला सियाराम बाबा म्हणून ओळखले जाते.
हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर नवभारत टाइम्सने 2 जुलै रोजी सियाराम बाबावर प्रकाशित केलेली बातमी आढळली.
या बातमीनुसार, सियाराम बाबा मध्य प्रदेशामधील खरगोन जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या घाटावर असलेल्या भट्याण आश्रमात राहतात.
त्यांच्या खऱ्या वयाबद्दल कोणालाच माहीत नाही, परंतु असे म्हटले जाते की, त्याचे वय सुमारे 109 किंवा 110 वर्षे असावे.
तसेच दैनिक भास्करनेदेखील 2021 मध्ये सियाराम बाबावर बातमी प्रसारीत केली होती. गुरूपौर्णिमेला सियाराम बाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविक जमतात. या वयातदेखील ते चष्मा न घालता रामायण वाचतात आणि स्वतःची सर्व कामे स्वतःच करतात.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा भ्रामक आहे. व्हिडिओमधील व्यक्ती सियाराम बाबा असून ते 109 - 110 वर्षांचे असून ते मध्य प्रदेशमधील भट्याण आश्रमात राहतात. त्यामुळे गुहेत १८८ वर्षांची कोणी व्यक्ती सापडली हा दावा चुकीचा आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
|