schema:text
| - उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उद्धव ठकरे म्हणतात की, “मी गोमांस आणि बीफ खातो तर काय बिघडलं?”
हा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरेंनी ते बीफ खात असल्याचे मान्य केले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ अर्धवट आहे. उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य स्वत:ला उद्देशून म्हटले नव्हते.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे मंचावर दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मी गोमांस खातो ,बीफ खातो ….काय माझं वाकडं करायचं ते करा ! – उध्दव ठाकरे.”
मूळ पोस्ट — फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम उद्धव ठाकरेंनी असे विधान केले असते तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी बातमी आढळत नाही.
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 12 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणादरम्यानचा आहे.
लोकसत्ताने या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले होते.
या व्हिडिओमध्ये 1:14:40 पासून उद्धव ठाकरे माहायुतीद्वारे गाईला राज्य मातेचा दर्जा दिलेल्या निर्णयावर टीका करतात.
पुढे ते सांगतात की, गेल्या काही दिवसांपूर्वी गोरक्षकांनी गोमांस तस्करीच्या संशयातून एका युवकावर गोळ्या झाडल्या. हा युवक हिंदू होता म्हणून कोणतीही बातमी प्रकाशीत झाली नाही. परंतु, हाच युवक दुसऱ्या धर्माचा असता तर माध्यमांवर ‘हिंदू खतरे में’ अशा बातम्या दिसल्या असत्या. जर गोमांसच्या संशयावरुन हिंदू मुलाला मारत असाल, तर मग किरेन रिजिजू स्वत: बोलले की, मी गोमांस खातो, बीफ खातो. काय माझं वाकड करायच ते करा. त्यांना कोण काहीच बोलत नाही. मी गोमांस खातो, बीफ खातो असं म्हणणाऱ्यांना व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रीमंडळात बसवता. हे माला मान्य नाही.”
हेच वक्तव्य उद्धव ठाकरेंच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.
तसेच हे भाषण लाईव्ह हिंदुस्तान, झी 24 तास आणि मनी कंट्रोल या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे.
खालील तुलमात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मुळ व्हिडिओला एडिट करुन अर्धवट क्लिप खोट्या दाव्यासह पसरवली जात आहे.
किरेन रिजिजूचे खंडण
भाजपचे केंद्रीय मंत्री मुख्तार नक्वी यांनी 2015 मध्ये गोमांस खाऊ इच्छिणाऱ्यांनी किंवा विकणाऱ्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे, अशी भूमीका मांडली होती. बातमी येथे वाचू शकता.
या पार्श्वभूमीवर दुसरीकडे मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी मी गोमांस खातो आणि ते खाण्यापासून मला कोणी रोखू शकतो का? असा प्रश्न उपस्थित केला. अशी कथित बातमी व्हायरल झाली होती.
ही बातमी जास्त व्हायरल झाल्यावर किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले की, माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. माला पत्रकारांनी “गोमांस खाऊ इच्छिणाऱ्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे,” या वक्तव्यावर माला प्रश्न विचारल्यावर मी स्पष्ट केले की, भारत हा वैविध्यपूर्ण देश असून यामध्ये बहु-वांशिक, बहु-धार्मिक आणि बहुराष्ट्रीय लोक राहतात. एका विशिष्ट भागात एक विशिष्ट धर्माचे लोक जात राहत असतील तर त्यांच्या विचार व भावनांचा आदर केला पाहिजे. मिजोरोममध्ये ख्रिश्चन लोक जास्त आहे तर ते त्यांच्या संस्कृती प्रमाणे राहतात. जसे जसे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये हिंदूची संख्या जात आहे तर ते त्यांच्या संस्कृतीचा आदर ठेवला पाहिजे.”
पुढे किरेन रिजिजू सांगतात की, मी गोमांस खात असल्याचे वक्तव्य केलेले नाही. मी आणि माझा परिवार गोमांस खात नाही. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. संपूर्ण बातमी येथे वाचू शकता.
किरेन रिजिजू यांनी उल्लेख केलेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळ व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात की, भाजप नेते किरेन रिजिजू स्वत: मी गोमांस व बीफ खात असल्याचे सांगतात. खोट्या दाव्यासह व्हिडिओ शेअर केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
Title:‘मी बीफ खातो’ असे उद्धव ठाकरे स्वत:ला उद्देशून म्हटले नव्हते; अर्धवट व्हिडिओ व्हायरलWritten By: Sagar Rawate
Result: Altered
|