schema:text
| - अवघ्या काही दिवसांवर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एका कार्यक्रमात आरक्षणावर चर्चा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दावा केला जात आहे की, नाना पटोले यांनी काँग्रेस आरक्षण हटवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये पत्रकार विचारतात की, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण काँग्रेस, राहुल गांधी किंवा इतर कोणीही संपवू शकत नाही. त्यानंतर नाना पटोले बोलतात की, हे सर्व खोटं आहे. बोलल्याने काही होत नाही.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “महाविकास आघाडी दलितांचे, वंचितांचे, ओबीसींचे, आदिवासींचे आरक्षण हटवणार!! काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की दलितांना, आदिवासींना, वंचितांना, ओबीसी समाजाला मिळणारे आरक्षण काँग्रेस हटवणारच!”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम व्हायरल व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, नाना पटोले यांनी ही चर्चा इंडिया टीव्हीवर केली.
हा धागा पकडून कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, इंडिया टीव्हीने या चर्चेचा व्हिडिओ 24 ऑक्टोबर रोजी युट्यूब चॅनलवर शेअर केला होता.
संपूर्ण चर्चा एकल्यावर लक्षात येते की, या चर्चेत नाना पटोले यांच्या विधानाचे सूर आरक्षणविरोधी नव्हते.
व्हिडिओमध्ये 13:30 मिनिटावर एक पत्रकार नाना पटोलेंना प्रश्न विचारते की, राहुल गांधी यांनी परदेशात केलेल्या वक्तव्याबाबत भाजप तुमच्यावर (काँग्रेस) प्रश्न उपस्थित करत आहेत. तुम्ही जातीय जनगणना करुन जातींमध्ये संघर्ष भडकावून पाहत असून मराठा आणि ओबीसींमध्ये तेढ निर्माण करु पाहात आहात. असे वक्तव्य करत भाजप मुद्दा बनवत आहेत.
नाना पटोले प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात की, ज्यांना इंग्रजी कळत नाही त्यांच्यासाठी हा मुद्दा असेल. आपल्याकडे तो (राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यातील आरक्षणवर केले वक्तव्य) व्हिडिओ असेल तर दाखवा.
त्यांचे म्हणणे होते की, जेव्हा आपल्या देशामध्ये सर्व समान होईल (सर्वांना समान संधी) तेव्हाच आपण आरक्षणाचा विचार करू शकतो. यात चूक काय? आणि बाबासाहेब आंबेडकरांची भूमिकाही तीच होती. राहुल जे काही बोलले त्यात चूक काय आहे ? ज्यांना इंग्रजी समजत नाही ते विधान तोडू-मोड करुन सांगतात.
या पूर्वीदेखील अमेरिका दौऱ्यात राहुल गांधींनी ते आरक्षण संपविण्याच्या तयारीत असल्याचे मान्य केले या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्याचे खंडण फॅक्ट क्रेसेंडोने आपल्या फॅक्ट-चेकमध्ये केले आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ एडिटेड आहे. मुळात नाना पटोले राहुल गांधी यांच्या “भारतात सर्व घटकांना जेव्हा समान संधी मिळेल तेव्हा काँग्रेस आरक्षण रद्द करण्याचा विचार करेल.” या वक्तव्याचे समर्थनात चर्चा करत होते. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
Title:काँग्रेस आरक्षण रद्द करणार असे नाना पटोले म्हणाले नाही; एडिटेड व्हिडिओ व्हायरलWritten By: Sagar Rawate
Result: Altered
|